COEP Production Dept. Students win first prize at IIT Tech Fest
Feb03 | Anjali
चालता चालता करा मोबाईल चार्ज ! सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 03rd, 2009 AT 11:02 PM

पुणे, ता. ३ - भारनियमन असले तरी किंवा तुम्ही घराबाहेर असलात तरी 'बॅटरी' संपल्यामुळे मोबाईलवरील तुमचे संभाषण आता बंद पडणार नाही. अक्षरशः चालता चालता (चालण्यामुळेच) मोबाईल 'चार्ज' करणारी यंत्रणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) सहा विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे.
'मॉर्निंग वॉक'ला जाताना पायावर ही यंत्रणा लावल्यास मोबाईलला दिवसभर लागणारी बॅटरी सहज 'चार्ज' होऊ शकेल, असा या विद्यार्थ्यांचा दावा आहे. पवई येथील 'आयआयटी'त नुकत्याच झालेल्या 'टेकफेस्ट' स्पर्धेत या यंत्रणेने प्रथम क्रमांक पटकावला.
'सीओईपी'च्या तेजस नरसिंहन, ईशा नाग, आदित्य नानावटी, हृषीकेश पांडे, सर्वेश पाटील आणि शची पांडे या विद्यार्थ्यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे.
या यंत्रणेचे तंत्रज्ञान सांगताना आदित्य म्हणाला, 'स्नायूंच्या ऊर्जेचे विजेत रूपांतर करणारी ही यंत्रणा फक्त ३५० ग्रॅमची असून, ही यंत्रणा पायाला लावल्यास चालताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही. एका डबाबंद उपकरणामध्ये वीजनिर्मिती करणारा 'डायनॅमो' बसवण्यात आला असून, तो फिरवण्यासाठी तार बाहेर काढण्यात आली आहे. एका पायाला डबाबंद उपकरण आणि दुसऱ्या पायाला पट्ट्याद्वारा तार जोडल्यास चालताना तारेची हालचाल होऊन डब्यातील 'डायनॅमो' फिरू लागतो आणि ३.५ वॉटची वीज निर्माण होते. ही वीज एका सर्किटद्वारा सेलमध्ये साठवली जाते. तेथून ती मोबाईल, एमपीथ्री प्लेअर, रेडिओ आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना देता येते.''
तो म्हणाला, 'वापरण्यास अत्यंत सोपी यंत्रणा विद्यार्थी, लष्करी जवान, गिर्यारोहक, कामगार, विजेची टंचाई असणाऱ्या गावांमधील नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते. मोठ्या प्रमाणात निर्मिती केल्यास फक्त साडेतीनशे रुपयांत हा मोबाईल चार्जर उपलब्ध होऊ शकतो. या यंत्रणेच्या 'पेटंट'साठी आम्ही अर्ज केला असून, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान असल्यामुळे काही नामवंत कंपन्यांनी उत्पादनासाठी उत्सुकता दाखवली आहे.''
'सीओईपी'मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत 'प्रॉडक्शन' शाखेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी याआधीही अपारंपरिक ऊर्जेच्या साधनांचे प्रयोग केले आहेत.
असे आहे उपकरण
फक्त ३५० ग्रॅम वजनाचे हे उपकरण आकाराने सात बाय ११ सेंटिमीटरचे आहे. एका तासाच्या चालण्यात मोबाईलला लागणारी सहा तासांची ऊर्जा यातून निर्माण होते. ऊर्जा साठवण्याची सोय असल्यामुळे केव्हाही चालले तरी खंड न पडता मोबाईल चार्ज होऊ शकतो; तसेच साठवलेली ऊर्जा ३.५ वॉटच्या कोणत्याही उपकरणाला देता येणे शक्य असल्यामुळे घातक "पेन्सिल सेल'चा वापरही टाळता येणे शक्य होते.